पुणे : चाणक्य मंडल परिवार मध्ये तयारी करून, UPSC परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या अनुभव कथनाचा कार्यक्रम आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या मध्ये पहिल्याच प्रयत्नात वयाच्या २२व्या वर्षी, भारतात २५५ वा रँक मिळवलेला समर्थ शिंदे, ६०४ वा रँक मिळवलेला अविष्कार डेर्ले आणि ७२० वा रँक मिळवलेला अभिजित पाखरे या विद्यार्थ्यांनी आपल्या अनुभवातून नवोदित विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चाणक्य मंडलचे विश्वस्त ॲड.सिध्दार्थ धर्माधिकारी यांनी केले.
या कार्यक्रमात, चाणक्य मंडलचे संस्थापक आणि संचालक अविनाश धर्माधिकारी यांनी प्रशासन स्वच्छ आणि कार्यक्षम ठेवत उत्तम काम करणारे ‘कार्यकर्ता अधिकारी’ होण्यासाठी यशस्वीतांना शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्पर्धा परीक्षा ही फक्त पद, प्रतिष्ठा, पैसा, संपत्ती आणि स्थैर्य यासाठी नसून, तो देशसेवेचा मार्ग आहे, हे समजून आपण तयारी करायला हवी असे सांगितले. असे असेल तरच आपल्या तयारीला समर्पणाची जोड येते आणि त्यातून आपल्या प्रतिभेला आणि आपल्या कष्टाला यश येते असे ते म्हणाले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद देताना अविनाश सरांनी त्यांच्याकडे भारताचा कार्यकर्ता अधिकारी होण्याची जबाबदारी असल्याची आठवण करून दिली.
यावर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून एकूण १०१६ जागांसाठी उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. त्यांपैकी तब्बल ३०६ विद्यार्थ्यांनी चाणक्य मंडल परिवारमध्ये विविध टप्प्यांवर मार्गदर्शन घेतले आहे. संपूर्ण भारतात पहिल्या १० मध्ये ३, पहिल्या २० मध्ये ६, पहिल्या ५० मध्ये १७ तर पहिल्या १०० पैकी ३२ विद्यार्थ्यांनी चाणक्य मंडल परिवारमध्ये परीक्षेसंबंधी मार्गदर्शन घेतले.