नागपूर : गेल्या काही महिन्यांपासून कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून मोठी चर्चा पाहायला मिळत होती. या मतदारसंघातून सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे खासदार आहेत. मात्र, यंदाच्या निवडणुकीत त्यांच्या उमेदवारीला भारतीय जनता पक्षाच्याच स्थानिक पदाधिकारी व नेत्यांकडून तीव्र विरोध करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर या ठिकाणी महायुतीकडून नेमका काय निर्णय होणार? यावर तर्क-वितर्कांना उधाण आलेलं असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठी घोषणा केली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त नागपूरमध्ये एका कार्यक्रमात भाजपाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर फडणवीस माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना कल्याणच्या उमेदवारीबाबत विचारणा केली असता त्यांनी श्रीकांत शिंदेच महायुतीचे उमेदवार असतील, हे स्पष्ट केलं.