विधानभवनाच्या वि स पागे केंद्राद्वारे पागे यांचे साहित्य जतन करणार
पुणे : विधानपरिषदेचे सभापती म्हणून वि स पागे यांनी दिलेले निर्देश दिपस्तंभाप्रमाणे नेहमीच मार्गदर्शक ठरत आले आहेत. पागे यांचे साहित्य विधानभवनाच्या वि स पागे केंद्राच्यामाध्यमातून प्रकाशित आणि जतन करण्याचे काम करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.
कै.वि.स. पागे यांच्या ३४व्या स्मृतिदिनानिमित्ताने, आध्यत्मिक विषयावर वि स पागे यांनी केलेल्या प्रवचनांच्या संकलनाचे ‘किंबहुना श्रीनारायणे विश्व कोंदले’ या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या शुभहस्ते व माजी आमदार उल्हासदादा पवार, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन ॲड.शशिकांत पागे व दिलीप पागे यांनी केले.
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, महाराष्ट्राचे देशामधील योगदान नमूद करताना वि स पागे यांच कार्य विचारात घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही. राज्यातील रोजगार हमी योजना ही पागे यांच्या संकल्पनेतून उभी राहिलेली योजना आहे जी पुढे सर्व देशभर सुरू करण्यात आली आहे. अनेक मजुरांना त्यातून जीवन जगण्याचा मार्ग मिळाला आहे. कोविड काळात या योजनेमुळे अनेक कामगारांना रोजगार मिळण्यास मदत झाली असल्याचे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
विधानपरिषदेच्या शतकोत्तर महोत्सवानिमित्त तयार करण्यात येणाऱ्या पुस्तकात वि स पागे यांचा सभागृतील भाषणांचा समावेश करण्यात आला आहे. वि स पागे यांचे प्रत्येक गोष्टीतील सार काढणे आणि ते पुस्तकांतून लोकांसमोर सादर करणे हे आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर म्हणाले, वि स पागे यांची आध्यत्मिक, तात्विक आणि धार्मिक या विषयावर दिलेल्या प्रवचनांवरील पुस्तके ही कायमच तरुण पिढीला मार्गदर्शक ठरणारी असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी आमदार उल्हासदादा पवार म्हणाले, वि स पागे यांच्याकडे लेखनाचे सामर्थ्य होते. त्यांनी विविध क्षेत्रातील विषयांवर लेखन केलेले आहे जे सर्वांसाठी मार्गदर्शक आहे. राज्यात रोजगार हमी योजना यशस्वीपणे राबविण्याच काम त्यांनी केल जी पुढे देशामध्ये लागू करण्यात आली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गीता पागे यांनी केले तर वि स पागे यांच्या कन्या उज्वला वरदे यांनी आभार मानले.