पुणे: सिंहगड रोडवरील दामोदर नगर येथील ‘दामोदर मित्र मंडळ’ यांच्या वतीने ‘शिवराज्याभिषेक दिन’ म्हणजेच ‘हिंदू साम्राज्य दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून सिनेअभिनेते राहुल सोलापूरकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. तरुण पिढीला शिवराज्याभिषेक दिन आणि हिंदू साम्राज्य दिन नक्की काय असतो व तो का साजरा केला जातो याचे महत्त्व काय यासाठी दामोदर मित्र मंडळाच्या वतीने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी राहुल सोलापूरकर बोलताना म्हणाले, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक संपूर्ण हिंदूराष्ट्रासाठी विजयाचा संदेश होता, म्हणून आपण शिवरायांचा राज्याभिषेक दिन हा हिंदू साम्राज्य दिन म्हणजे सुवर्णकाळाचे स्मरण म्हणून साजरा करतो.
कार्यक्रमांमध्ये पुढे बोलताना सोलापूरकर म्हणाले, स्वराज्याचे सिंहासन व्यक्तिगत स्वार्थ,सन्मान यासाठी नव्हते, तर रयतेच्या सुखासाठी होते.’शिवाजी’ या तीन शब्दांचा अफाट पसारा समजून घेण्यास एक जन्म अपुरा पडेल ,अत्यंत हुशार,विनम्र, साहसी, मुत्सद्दी असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे हिंदू समाजाचे नेतृत्व कसे असायला हवे याचे मूर्तिमंत उदाहरण आहेत. यावेळी उपस्थितीमध्ये टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.
या कार्यक्रमाला तरुणाई बरोबर दामोदरनगर परिसरातील अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला देखील उस्फूर्तपणे या व्याख्यानासाठी उपस्थित होते. दामोदर नगर येथील प्रसिद्ध पालखी सोहळा, तसेच भव्य मिरवणुक देखील काढण्यात आली होती.स्वयंसेवकांनी यावेळी व्याख्यात्या तसेच श्रोत्यांचे आभार मानले.