मुंबई : लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपायला आता काही तास उरले असतानाच सर्व उमेदवार आता पदयात्रा काढून घरोघरी जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी आज कामराज नगर मध्ये पदयात्रा काढून मतदारांच्या भेटी घेतल्या तर म्हाडा कॉलनी येथे आलेल्या मिहिर कोटेचा यांना मात्र मतदारांनी अल्प प्रतिसाद दिला.
उद्या प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने आज उमेदवारांनी पदयात्रेवर जोर दिला. ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी सकाळ पासूनच घाटकोपर कामराज नगर या ठिकाणी पदयात्रा काढून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. काढण्यात आलेल्या पदयात्रेत महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. तर मिहिर कोटेचा यांनी मुलुंड पुर्व म्हाडा वसाहत या ठिकाणी पदयात्रा काढली. मात्र म्हाडा वसाहत ही शिवसेनेचा बाले किल्ला असल्याने कोटेचा यांना या ठिकाणी अल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे नाराज झालेल्या कोटेचा यांनी आपली पदयात्रा आवरती घेत ते निघून गेले. मराठी गुजराती वाद निर्माण करणा-या कोटेचा यांना मराठी बहुल भागात प्रतिसाद मिळत नसल्याने कोटेचा यांचा पराभव आता निश्चित मानला जात आहे.
त्यातच मुंबईतील सर्व जागा अडचणीत आल्याने आता मोदींनाच रस्त्यावर उतरविण्याचे काम भाजपने केले आहे. मात्र मोदींनी घाटकोपर येथे रोड शो केला पण होल्डिंग दुर्घटनतील जखमींची भेट घेतली नाही तर मोदींच्या रोड शोसाठी रेल्वे, मेट्रो सेवा बंद केल्याने मुंबईकरांनी मोदींवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
त्यामुळे मोदींचा हा रोड शो फ्लॉप गेल्याची चर्चा आहे. पंतप्रधान मोदी यांचा रोड शो फ्लॉप झाल्याची चर्चा भाजप गोटात असून त्यासाठीच मतदारांना पुन्हा एकदा आकर्षित करण्यासाठी शिवाजी पार्क या ठिकाणी मोदींची सभा घेतली आहे.