Spread the love

मुंबई : मोदी काळात सत्तेचा गैरवापर होत असून मोदींवर टीका करणा-यांना तुरुंगात टाकले जात आहे. गुजरातने स्वत:च्या राज्यात कारखाने उभारावे महाराष्ट्रातील कारखाने गुजरात मध्ये नेऊ नये. आताची निवडणूक साधी सोपी राहील नसून चुक झाली तर त्याची जबरदस्त किंमत आपल्याला चुकवावी लागेल असा घणाघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या जाहीर सभेत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. 

ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या प्रचारार्थ कांजुर मार्ग येथे एका जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या दहा वर्षामध्ये सिलेंडरच्या किंमती दुप्पटीने वाढल्या आहेत. 2009 साली लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी मोदी यांनी महिलांना मतदान करायला जाताना सिलेंडरला नमस्कार करुन जाण्याचे आवाहन केले होते, याची आठवण करुन देत शरद पवार यांनी गॅस सिलेंडर, पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीला भाजप सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला. देशात तरुण खुप आहेत ते अस्वस्थ आहेत त्यांच्या हातांना काम नाही. मात्र भाजप या तरुणांना काम देण्याऐवजी महाराष्ट्रातील कारखाने, उद्योगधंदे गुजरातला पळवत आहेत. अशी टीका करीत शरद पवार यांनी गुजरात सरकारला कानपिचक्या देत गुजरातने स्वत:चे कारखाने उभारावे महाराष्ट्राचे कारखाने पळवून नेऊ नये असा सल्ला दिला. देश आणि मुंबईच्या विकासासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांना भरघोष मतांनी विजयी करण्याचे आवाहन शरद पवार यांनी ईशान्य मुंबईतील मतदारांना केले. 

 दहा वर्षामध्ये मोदी सरकारने कोणाचा काय विकास केला? फक्त मोठमोठे उद्योग धंदेवाल्यांचा विकास झाला. ‘अब की बार भाजप तडीपार’ हा महाराष्ट्राचा नारा आहे. विकासाला मत द्या. माझे मित्र संजय दिना पाटील यांना प्रचंड बहुमतांनी विजयी कराल, असा मला ठाम विश्वास आहे. असे कॉंग्रेस नेते भाई जगताप यांनी सांगितले.

 

लोकशाही आपल्याला वाचवायचे असेल तर या कमळाबाईला वृद्धाश्रमात पाठवायची जबाबदारी सर्वांना घ्यावी लागेल. भाजप आपल्या सगळ्यांचे शत्रू आहे हे लक्षात ठेवावे. महाराष्ट्रात सगळ्यांनी एकत्र येऊन शरद पवार, उध्दव ठाकरे, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली ही लढाई सर्वांना लढायची आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई उभी केली आहे. मोदी -फडणवीस- शाह कोणीही आले तरी आमचं ठरलं आहे, फक्त मशाल हाती घ्यायची. मोदीचे सरकार हे व्यापाऱ्यांचे सरकार आहे. मोदींची ताकद ईडी, सीबीआय एवढीच आहे. देशाची लोकशाही वाचवायची असेल तर संजय दिना पाटील यांना आणि मशाल चिन्हाला मत देऊन बहुमतांनी विजयी कराल असे ठाम विश्वास मला आहे. असे वक्तव्य शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले.

 

कांजूरमार्ग पूर्व परिसरात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते, राज्यसभा खासदार संजय राऊत, खासदार चंद्रकांत हांडोरे, काँग्रेस आमदार भाई जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीच्या जाहीर सभेत भाजपाला हद्दपार करून या वेळी मशालीला संसदेत न्यायचेच, असा निर्धार करण्यात आला.