Spread the love

पुणे : कोयत्याने वार केल्याचा गंभीर आरोप असतानाही दोषारोपपत्र दाखल होण्याआधी केलेला जामीन अर्ज आणि मोक्का लागू होत नसल्याच्या आधारावर दोघांसह पाच आरोपींना विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी ५० हजारांच्या जातमुचलक्यावर अटी- शर्तीवर जामीन मंजूर केला आहे. लखन बाळू मोहिते आणि तुषार बाळू मोहिते या दोघांसह ओमकार मारुती देढे, हशनेल शेनागो आणि अनिकेत रवींद्र पाटोळे या पाच जणांची सुटका केली आहे.

 

आरोपी लखन व तुषार यांच्या वतीने वकील सुशांत तायडे यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. लखन बाळू मोहिते याने फिर्यादीवर कोयत्याने वार केल्याचा आरोप ठेवत आरोपीला त्याच्या अन्य साथीदारांसोबत अटक करून मोक्का कायद्यांतर्गत गुन्ह्यात कलम वाढ करण्यात आली होती. त्यांच्यावर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

लखन बाळू मोहिते आणि तुषार बाळू मोहिते यांच्याबाबत कोयत्याचा आधार असूनसुद्धा दोषारोप पत्र दाखल होण्याआधी जामीन अर्ज दाखल केला होता, या दोघांसह आरोपी ओंकार मारुती देढे, हशनेल नागो आणि अनिकेत रवींद्र पाटोळे यांनीदेखील जामीन अर्ज दाखल केला होता.

 

आरोपी लखन व तुषार यांच्या वतीने सुशांत तायडे यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून आरोपींना अटी शर्तीवर जामीन मंजूर करण्यात आला. या खटल्याचे संपूर्ण कामकाज वकील सुशांत तायडे यांच्यासह प्रज्ञा कांबळे, दिनेश जाधव, जितू जोशी आणि शुभांगी देवकडे यांनी पाहिले.