Spread the love

अमरावती : भारतीय जनता पक्षाने अमरावतीतून खासदार नवनीत राणा यांना लोकसभेचे तिकीट दिले आहे. मात्र, त्यांच्या उमेदवारीला महायुतीचा घटक पक्ष असलेल्या प्रहारकडूनच विरोध करण्यात येत आहे. एवढचं नाही, तर आता प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी नवनीत राणांविरोधात थेट उमेदवारही जाहीर केला आहे. बच्चू कडू यांनी ठाकरे गटाचे नेते दिनेश बूब यांना प्रहार पक्षाकडून लोकसभेची उमेदवारी दिली आहे.

आज ( शुक्रवार, २९ मार्च) अमरावतीत झालेल्या पत्रकार परिषदेत दिनेश बूब यांनी प्रहार पक्षात प्रवेश केला. तसेच त्यांना लोकसभेची उमेदवारीही देण्यात आली. दरम्यान, उमेदवारी मिळताच दिनेश बूब यांनी टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधला. “यंदाच्या निवडणुकीत कोणाचा पराभव करायचा, हे अमरावतीतल्या जनेतेने आधीच ठरवले आहे. मात्र, खासदार कोणाला करायचे यासाठी अमरावतीत सक्षम उमेदवार नसल्याने प्रहार पक्षाने मला उमेदवारी दिली आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

“जर जनतेने मला निवडून दिले, तर चुकीच्या माणसाला निवडून दिल्याचा पश्चाताप त्यांना होणार नाही. अमरावतीकरांना अभिमान वाटेल, असे काम मी करेन. जिल्ह्याच्या हितासाठी आणि भावी पिढीसाठी आदर्श लोकप्रतिनिधी निर्माण व्हावा, यासाठीच मला उमदेवारी देण्यात आली आहे”, असेही ते म्हणाले.